अटल भूजल योजनेतून जालन्यात १७ कोटींचा खर्च file photo
जालना

Atal Bhujal Yojana : अटल भूजल योजनेतून जालन्यात १७ कोटींचा खर्च

२,६०६ जलसंवर्धन संरचना उभारल्या, भूजल पातळी वाढीसाठी मोठी गुंतवणूक

पुढारी वृत्तसेवा

Rs 17 crore spent in Jalna through the Atal Bhujal Yojana

संघपाल वाहूळकर

जालना : जिल्ह्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असून, यासाठी एकूण १७ कोटी २७ लाख १३ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. हा निधी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) यांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भूजल पुनर्भरणासाठी रिचार्ज शॉफ्ट, ट्रेंच कम रिचार्ज शॉफ्ट आणि (डब्ल्यूएटी) वॉट अशा एकूण २,६०६ संरचना उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक काम रिचार्ज शॉफ्टचे झाले असून २,२९५ रिचार्ज शॉफ्टसाठी १२ कोटी २३ लाख ५७हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच ३१० ट्रेंच कम रिचार्ज शॉफ्टसाठी ५ कोटी ७१ हजार रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय एका वॉट या संरचनेसाठी ३ लाख ४८ हजार रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.

जालना, परतूर आणि घनसावंगी या तालुक्यांतील विविध गावांमध्ये ही कामे करण्यात आली असून, काही गावांमध्ये शंभरहून अधिक संरचना उभारण्यात आल्याने पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवण्यास मदत होणार आहे. यामुळे भविष्यात विहिरी, बोअरवेल व जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भूजलाची झपाट्याने घट होत असलेल्या जालना जिल्ह्यासाठी अटल भूजल योजना संजीवनी ठरली आहे. योग्य देखभाल व नियमित निरीक्षण केल्यास या योजनेचा दीर्घकालीन फायदा शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना होणार असल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे.

देखभाल दुरुस्तीअभावी अवकळा

बहुतांश संरचनांना देखभाल दुरूस्तीअभावी अवकळा आली आहे. यंदा अटल भूजल योजनेअंतर्गत असलेल्या गावात चांगला पाऊस झाला. परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या अतिरिक्त झालेल्या पावसामुळे शिवाय, जीएसडीए विभाग आणि ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे जिल्हाभरातील बहुतांश संरचनांना अवकळा आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT