Jalna Agricultural News : डोळ्यासमोर पीक जळतय; बळीराजा हतबल file photo
जालना

Jalna Agricultural News : डोळ्यासमोर पीक जळतय; बळीराजा हतबल

नद्या-नाले कोरडे, विहिरींनी गाठला तळ, पिके सुकू लागली, शेतकऱ्यांची चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

Rivers and streams dried up, wells bottomed out, crops started drying up, farmers' worries increased

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्याचे दिवस सरत चालले तरी वरुणराजाची कृपादृष्टी घनसावंगी तालुक्यावर होत नसल्याने ग्रामीण भागात चिंतेचे सावट गडद झाले आहे. नद्या, नाले, ओढे कोरडे पडले असून, गावोगावच्या विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. अनेक विहिरींनी तळ गाठल्याने खरीप पिकांसह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डोळ्यांसमोर सुकत चाललेले शिवार पाहून शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत असून, आता पिकांपेक्षा गुराढोरांची तहान कशी भागवायची, हा मोठा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.

हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस, सोयाबीन, तूर, मका आदी पिकांची पेरणी केली. पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने जमिनीतील ओलावा कमी होत गेला. सध्या अनेक ठिकाणी पिके वाढीच्या व फुलकळी अवस्थेत असताना पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च आणि कष्ट वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

विहिरींमध्ये शिल्लक असलेले पाणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. उपलब्ध पाणी पिकांना द्यायचे की जनावरांसाठी राखून ठेवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिके वाचविण्यासाठी पाणी दिले तर जनावरांच्या पाण्याची चिंता, तर जनावरांसाठी पाणी राखून ठेवले तर पिके सुकण्याची भीती, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

पावसाअभावी शेतातील हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेल्या पशुधनाला पाणी व चारा मिळणे कठीण झाले तर शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

शेतात उभे पीक आहे, पण त्याला जगविण्यासाठी पाणी नाही. रोज सकाळी आभाळाकडे पाहतो आणि आज पाऊस येईल अशी आशा करतो. मात्र दिवस ढगाळ जातो आणि पाऊस न पडताच संपतो. आता पीक वाचण्यापेक्षा घरातील गुरे कशी जगवायची, याचीच चिंता लागली आहे.
- अशोक निवदे, मच्छिंद्र चिंचोली
यंदा सुरुवातीला पाऊस झाल्यामुळे मोठ्या आशेने शेती केली. कर्ज काढून बियाणे, खत घेतले. आता विहिरीने तळ गाठला आणि शेतातील पीक सुकू लागले. हातात पैसा नाही आणि समोर सुकलेले शिवार आहे. शेतकऱ्याची अवस्था काय झाली आहे, हे आम्हालाच माहिती आहे.
ज्ञानेश्वर पवार, शेतकरी बोलेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT