Jalna Agriculture News  pudhari photo
जालना

Jalna Agriculture News : खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

बी-बियाणे, खते महागली; तर शेतमालाल भाव मिळेना

पुढारी वृत्तसेवा

आन्वा ः ग्रामीण भागात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असली तरी वाढत्या शेती खर्चामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. रासायनिक खतांच्या आणि बियाण्यांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्च वाढला दुसरीकडे असून शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

यावर्षी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मका यासारख्या पिकांच्या बियाण्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर डीएपी, युरिया, एनपीके यासारख्या रासायनिक खतांचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागत आहे. अनेक शेतकरी कर्ज काढून शेतीची मशागत, बियाणे आणि खते खरेदी करत आहेत.

शेतीमालाला हमी भावासह बाजारात योग्य दर मिळणे आवश्यक आहे. तसेच खत व बियाण्यांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती व्यवसाय तोट्यात जाऊन शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत, मात्र शेतीमाल विक्रीच्या वेळी योग्य भाव मिळत नाही. मागील हंगामात सोयाबीन, कापूस आणि मका इतर पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे नवीन हंगामासाठी भांडवल उभे करणेही कठीण झाले आहे.

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनाची शाश्वती नाही, तर दुसरीकडे वाढत्या खर्चामुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. तसेच सततच्या संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

मदतीची गरज

शेती मशागतीसह पेरणी, कापणी खर्च रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात यावा. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. सोबतच शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात जर आणायचे असेल व शेती व्यवसाय टिकवायचा असेल तर याशिवाय पर्याय नाही, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT