आन्वा ः भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागातही ऑनलाइन खरेदीचा कल वाढला. त्यामुळे ग्रामीण किरकोळ व्यापारी व दुकानदार संकटात सापडले. उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सणासुदीच्या काळात पारंपरिक बाजारपेठ गजबजलेली असतानाच ऑनलाइन बाजारपेठेने मात्र अभूतपूर्व वेग पकडला आहे. मोबाइल फोनपासून कपडे, बूट-चप्पल, किरकोळ घरगुती वस्तू रिचार्ज व दैनंदिन गरजेच्या साहित्यापर्यंत सर्वच वस्तू एका क्लिकवर घरपोच उपलब्ध होत आहेत.
स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत चालला आहे. पूर्वी केवळ शहरी भागापुरती मर्यादित असलेली ऑनलाइन खरेदी आता लहान गावांपर्यंत येऊन पोहोचली आहे. सुलभ पेमेंट पद्धतीमुळे ग्रामीण ग्राहक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत.
गावोगावी असलेली मोबाइल दुकाने, कपड्यांची दुकाने, जनरल स्टोअर्स तसेच इतर किरकोळ विक्रेते ग्राहकांची वाट पाहत बसलेले असताना दिसत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर काही वर्षांत अनेक लहान दुकाने बंद पडण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
उपाययोजना करा
सध्या ऑनलाईन व्यापारात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर सवलती, दरनियंत्रणाचा अभाव व मक्तेदारीकडे होणारी वाटचाल यावर सरकारने अंकुश लावणे आवश्यक आहे. व्यवसाय होत नसल्याने ग्रामीण भागातील दुकानदार हैराण झाले आहेत. यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे.
नियम करा
ऑनलाइन बाजारासाठी स्पष्ट व कडक नियम बनवले गेले नाहीत तर ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागातीलही व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहेत.