

पैठण : पैठण तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेने यंदा ज्वारीचे पीक जेमतेमच आहे. त्यात मजूर मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. ज्वारी पेरणीपासून पाखरांची राखण करीत काढणी, मोडणी, मळणी यावर होणारा खर्च व त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न पाहता भविष्यात भाव वाढण्याची शक्यता आहे.
गतवर्षी पैठण तालुक्यात मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत आपले अस्तित्व दाखवले. त्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा रब्बी पेरणीवर परिणाम झाला होता. मागील तीन-चार वर्षांत पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा ठिबक सिंचन पद्धतीने वापर करून फळबागा, पालेभाज्या, फळभाज्या व ऊस यासारखी उत्पादने घेणे पसंत केले आहे.
मागील 4 वर्षांत ज्वारीचे पीक घटले आहे. पाण्याची उपलब्धता नसलेले शेतकरी आजही रब्बी हंगामातील ज्वारी सारखे पीक घेऊन ज्वारी सह जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करून ठेवतात. अनेकांच्या आहारात नित्याने गव्हाचे प्रमाण जास्त असले तरी ज्वारी सारखे धान्य हे मानवी जीवनाच्या आरोग्याला नेहमीच फायदेशीर ठरले आहे.
या भागातील शेतकरी शेकडो वर्षांपूर्वीपासून टपोरे दानेदार जातीच्या ज्वारीला मोठ्या प्रमाणात पसंती देतात. ही ज्वारी खाण्यासाठी पौष्टिक आहे. त्याचबरोबर या जातीचा कडबाही उत्तम आहे. या ज्वारीच्या वाणाला बाजारामध्ये सर्वाधिक दर मिळतो.
आर्थिक नियोजन कोलमडले
उत्पादित होणाऱ्या ज्वारीच्या काढणीला मजूर मिळत नाहीत. मिळालेच तर त्यांचा रोजगार शेतकऱ्यांना परवडत नाही. इतके करूनही उत्पादन जेम तेमच आहे. मजुराची सध्याची परिस्थिती पाहता पुरुष कामगाराला सकाळी 8 ते 11 यावेळेत 450 रुपये व महिला कामगारास 300 रुपयांपर्यंत रोजगार देऊन देखील मजूर मिळत नसल्याने शेतकरी भविष्यात ज्वारीचे पीकच घ्यायचे नाही याचा विचार करू लागले आहेत.
ज्वारीच्या पेरणी पासून ते मळणी पर्यंत होणारा उत्पादित खर्च शेतकऱ्याला परवडत नाही. सध्या चांगल्या मालदंडी ज्वारीचे दर 45 ते 50 रुपयांपर्यंत असला तरी नवी ज्वारी बाजारात येताच हे दर खाली उतरलेले असतात आणि ज्वारीचे साठवण करून ठेवण्याची क्षमता सर्वसामान्य शेतकऱ्यांना नसते, त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी आर्थिक कोंडी झाली आहे.
शेतमजुरांना क्विंटलभर ज्वारीचा मोबदला
ज्वारीची काढणी, कापणी, मळणी या गोष्टी थोड्या कष्टाच्याच झाल्या आहेत.सध्या ज्वारी काढणीचे दर अडीचशे रुपये आहे. सोबत एकरभरातील ज्वारी काढायचे ठरले तर शेतमजुरांना क्विंटलभर ज्वारीचा मोबदला परतावा म्हणून द्यावा लागत आहे. परिसरात मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी मजुरांच्या शोधात आहे.