Revise health index otherwise action : Collector Ashima Mittal
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : आरोग्याच्या निर्देशांकामध्ये सुधारणा, गुणात्मक काम करा अन्यथा सक्त कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. मंगळवार, दि. १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दल समितीची सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आशिमा मित्तल यांनी नियमित लसीकरण, गोवर रुबेला निर्मूलन, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम (एनक्यूएएस), एच.पी.व्ही. लसीकरण, इत्यादींबाबत आढावा घेतला. यात त्यांना काही निर्देशांकामध्ये काम कमी असल्याचे निदर्शनास आले. एच.पी.व्ही. लसीकरण जिल्ह्यात अत्यंत कमी असून ते वाढविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. कृष्णकांत कनवारिया यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांना दिले. एच.पी.व्ही. लसीकरण वाढविण्यासाठी शाळांना भेटी देऊन पालकांचे समुपदेशन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा व मार्गदर्शन सहायक संचालक, आ.से. कुष्ठरोग डॉ. सुधाकर शेळके यांनी घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी पल्स पोलिओ, एच.पी. व्ही. लसीकरण, गोवर व रुबेला दुरीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. यावेळी डीएचओ डॉ. जयश्री भुसारे आदींसह सर्व बीडीओ उपस्थित होते.
रेफर करणे टाळावे : डॉ. राजेंद्र पाटील
ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा लाभरुग्णांना द्यावा. रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन रेफर करणे शक्यतो टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा आढावा घेतला.