Jalna News : मतदार संघातील सिंचन, पाणी टंचाईचा प्रश्न सोडवा file photo
जालना

Jalna News : मतदार संघातील सिंचन, पाणी टंचाईचा प्रश्न सोडवा

आमदार हिकमत उढाण यांचा जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

Resolve the issues of irrigation and water scarcity in the constituency

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित सिंचन प्रश्न, वाढती पाणीटंचाई तसेच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शाश्वत पाण्याची उपलब्धता यासंदर्भात आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन विविध महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी मतदारसंघातील के.टी. वेअर्सचे बंधाऱ्यात रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच गल्हाटी प्रकल्पामध्ये अपेक्षित प्रमाणात पाणीसाठा होत नसल्याने परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यासाठी पाथरवाला उच्च पातळी बंधाऱ्यातून उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी वळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. ही योजना कार्यान्वित झाल्यास परिसरातील सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार उढाण यांनी सांगितले.

सन २०१० पासून रखडलेल्या हातवण बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी तातडीने २०० कोटी रुपयांचा पुरवणी निधी मंजूर करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अनेक गावांचा पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच मौजे गुंज, ता. घनसावंगी व मौजे साष्ट पिंपळगाव, ता. अंबड येथे गोदावरी नदीवर नवीन उच्च पातळी बंधारे उभारण्यास मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा वाढून परिसरातील भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. यासोबतच घनसावंगी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक पाणी आरक्षण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

या सर्व मागण्यांवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मतदारसंघातील सिंचन क्षमता वाढविणे, शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून देणे व ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डाव्या कालव्यातून पाणी उपलब्ध करून द्या

दोदडगावसह दहा गावांतील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावरून अथवा पाथरवाला बंधाऱ्यातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध तांत्रिक पर्याय सुचविण्यात आले. या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणीही करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT