Ration wheat taken to market for sale; Goods worth 1 lakh 20 thousand seized
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील कसबा विठ्ठल मंदिर भागात रेशनचा गहू व तांदूळ बेकायदा बाजारात विक्रीसाठी मालवाहू रिक्षातून घेऊन जाताना कदीम जालना पोलिसांनी पकडला. या कारवाईत १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुना जालन्यातील कसबा भागात रेशनचे गहू व तांदूळ मालवाहू रिक्षा (क्र एम एच २१-एक १२३२) मधे भरून तो बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना कदीम जालना पोलिसांनी तो छापा मारून पकडला. या प्रकरणी आरोपी तौसिफ शेख युसुफ (रा. खानसरी आर.एच.व्हि. स्कूलच्या बाजूला नवा जालना) याच्या ताब्यातून अवैधरीत्या बाज ारात विक्रीकरिता नेण्यात येणारा १ लाख १९ हजार ८०० रुपये किमतीचा गहू आणि तांदूळ असा माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदिम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. मोरे, जमादार सदाशिव राठोड, पोलिस कर्मचारी बाबा गायकवाड, संदीप चव्हाण, बलराम जारवाल, मुटकुळे, मतीन शेख, पठाण यांनी केली आहे.
जालना शहरात मोठ्या प्रमाणात रेशनचा गहू व तांदूळ नागरिक भंगार विक्री करणाऱ्यांना विक्री करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. अनेक भंगार विक्री करणारे लाउडस्पिकरवर तांदूळ, गहू विकत घेतल्या जातील असे राज-रोष सांगत असल्याचे दिसत आहे.