Rain continues eight talukas of the district including Jalna city, farmers are satisfied.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरासह जिल्ह्यात श्रावणाच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.
जालना जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे कुठे अतिवृष्टी होत असतानाच काही भागांत जेमतेम पावसावर पिके तग धरून होती. मात्र शुक्रवारी श्रावणातील पहिल्याच दिवशी पडलेल्या श्रावणसरींनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले. खरिपातील सोयाबीन, मका, तूर, कापूस, मूग, उडीद या पिकांना या पावसामुळे चांगला फायदा झाला आहे.
जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, मंठा, परतूर, घनसावंगी, अंबड व बदनापूर तालुक्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस चांगला समजला जात आहे. जालना जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन तालुक्यात २५१, जाफराबाद २९१, जालना ३०८, अंबड २०५, परतूर २४२, बदनापुर २५९, घनसावंगी २४०, मंठा २४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सातोना, मंठा तालुक्यातील तळणीसह इतर ठिकाणी सोमवारी रात्री अतिवृष्टी झाल्यानंतर पुन्हा शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे. अनेक ठिकाणी नद्या, ओढे दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडेचा अनुभव या पावसामुळे सर्वत्र पहावयास मिळत आहे.
जालना जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अलर्टचा इशारा कुलाबा हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्टमुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. २७ ते २९ दरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातील विविध शिव मंदिरांत श्रावणमासानिमित्त सुशोभीकरण करण्यात आले होते. शहरातील विविध रस्त्यांवर बेलाच्या पानासह फुले विक्रीसाठी आली होती. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी बरसलेल्या श्रावण सरींनी उत्साहाचे वातावरण दिसून आले.