Public contributions bolster water conservation in Dhakephal
जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहत असून, घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS), कन्सर्न इंडिया फाउंडेशन (CIF) आणि डीसीबी बँकेच्या संयुक्त सहकार्याने शाश्वत समुदाय विकास कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कामासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत सुमारे ३५,००० लोकवर्गणी संस्थेकडे सुपूर्द केली. महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला पाठिंबा दिला. या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक सीताराम दशरथ येडे यांचे योगदान विशेष प्रेरणादायी ठरले. अनुसूचित जाती प्रवर्गातील येडे यांच्याकडे स्वतःच्या नावावर शेतजमीन नसून ते गायरान जमिनीवर अवलंबून राहून बटाईने शेती करतात. पत्नीचे निधन झाले असून, त्यांची मुले ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी गावाच्या जलसंधारणासाठी स्वतःच्या खिशातून १,००० लोकवर्गणी दिली.
या योगदानातून गावाप्रती असलेली बांधिलकी आणि सामूहिक विकासाची भावना अधोरेखित झाली. आर्थिक परिस्थिती कोणतीही असो, गावाच्या भविष्यासाठी प्रत्येक व्यक्ती योगदान देऊ शकते, हा संदेश त्यांच्या कृतीतून मिळाला. या कार्यक्रमाला कन्सर्न इंडिया फाउंडेशनचे प्रतिनिधी धनंजय सणस, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे प्रतिनिधी ओंकार उगले आणि संदीप जाधव उपस्थित होते. ग्रामस्थ, महिला आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ढाकेफळने दुष्काळमुक्त आणि पाणीसमृद्ध गावाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.
दीड कोटी पाणीसाठा निर्माण होणार
यापूर्वी गावात सुमारे १,३०० मीटर नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले होते. यंदा आणखी ७०० ते ८०० मीटर काम प्रस्तावित असून, त्यातून अंदाजे १.५ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या पाण्याचा उपयोग शेती, भूजल पुनर्भरण आणि भविष्यातील पाणी उपलब्धतेसाठी होणार आहे.
लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट होईल ढाकेफळमध्ये जलसंधारणाच्या कामासाठी ग्रामस्थांनी दाखविलेला उत्साह आणि लोकवर्गणीचा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. गावातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन पाण्याच्या प्रश्नावर काम केल्यास शाश्वत विकास साधता येईल. नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे पाणीसाठा वाढण्यासोबतच भूजल पुनर्भरणालाही मदत होईल. -ओंकार उगले, प्रतिनिधी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था