Principal and four others arrested while accepting a bribe of ₹1.5 lakh
जालना, पुढारी वृत्तसेवा : सेवानिवृत प्रबंधकाच्या अर्जित रजेचे रोखीकरण, कालबद्ध पदोन्नती लाभ आणि जीपीएफची थकीत रक्कम देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या महात्मा जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यासह ५ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) दुपारी महाविद्यालयात रचलेल्या या सापळा कारवाईत सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून, या धडक कारवाईमुळे जालना जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी प्राचार्य राहुल नारायण हिवराळे (वय ५३, रा. जालना), कार्यालय अधीक्षक बबन रामदास राठोड (वय ५१, रा. तुपेवाडी तांडा, बदनापूर), पहारेकरी ईश्वरदास अंबादास शिंदे (वय ४८, रा. माऊली नगर, अंबड रोड, जालना), लिपिक कैलास गबाजी कुरंगळे (वय ५२, रा. गोकुळधाम सोसायटी, इंदेवाडी, जालना), ग्रंथालय सहायक ज्ञानेश्वर मुरलीधर मदन (वय ५१, रा. माऊली नगर, जालना) आदींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, तक्रारदार (वय ५९ वर्ष) हे महात्मा जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, जालना येथून ३० जून २०२५ रोजी प्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या अर्जित रजेच्या रोखीकरणाचा ९,३३,४०८ रुपयांचा चेक, कालबद्ध पदोन्नतीचा लाभ आणि जीपीएफ खात्यातील रक्कम मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, हे हक्काचे पैसे देण्याच्या बदल्यात प्राचार्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना 'एसीबी'चे पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलिस अंमलदार अतिश तिडके, गजानन खरात, गजानन कांबळे, गणेश चेके, शिवलिंग खुळे, अमोल चेके, मनोहर भुतेकर, संदीप लहाने व चालक भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने पार पाडली.
'एसीबी 'चा महाविद्यालयातच सापळा
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालन्याकडे ३० जुलै रोजी लेखी तक्रार दिली. त्याच दिवशी दुपारी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपींनी १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, गुरुवार (दि. ६) रोजी दुपारी १२:४२ ते १:५२ वाजेच्या सुमारास एसीबीच्या पथकाने महाविद्यालयातच सापळा रचला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने धाड टाकून पाचही आरोपींना जागेवरच ताब्यात घेतले.