Preventive team to prevent sand theft
मंठा, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील वाळू घाट असलेल्या टाकळखोपा, वाघाळा, किर्ला, दुधा, सासखेडा, खोरवड, वझर सरकटे, भुवन, पोखरी केंधळी, लिंबखेडा, पाटोदा, आर्डा खारी गावात प्रशासनाच्यावतीने वाळू चोरीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक चोवीस तास कार्यरत राहणार आहे.
मंठा तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी तहसीलदारांसह वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने तालुक्याअंतर्गत २४ बाय ७अवैध गौण खनिज प्रतिबंधात्मक पथक कार्यरत केले आहे. सदर पथक दररोज दिलेल्या वेळेत व ठिकाणी कार्यरत राहणार आहे.
ज्या नागरीकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे वारंवार गुन्हा दाखल झालेला आहे. त्याना तालुक्यातुन हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच अवैध गौण खनिज बैठ व फिरते पथकाच्या ठिकानाची वाळू वाहतूक करणा-यांना खबर लोकेशन देणारे खबरी यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मंठा तहसीलदारांनी वाळूचोरी प्रकरणी गुरुवार (९) व शुक्रवार (१०) रोजी दोन टिप्पर पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. मंठा तालुक्यात अवैध गौण खजिन पथकाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे एप्रिल २०२५ पासून ३ गुन्हे दाखल झाले आहे. मंठा तालुक्यात विना परवाना अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना वाहन आढळून आल्यास संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, पोलिस पाटील व पोलिस विभाग यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी नागरिकांना केले आहे.