Municipal Schools : जालना महापालिकेच्या शाळांचा 'मास्टर प्लॅन' तयार करा file photo
जालना

Municipal Schools : जालना महापालिकेच्या शाळांचा 'मास्टर प्लॅन' तयार करा

१६ शाळांचा विद्यार्थी संख्येनुसार फेरआढावा; ग्रंथालये सुरू करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Prepare a 'master plan' for Jalna Municipal Corporation schools

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिकेच्या अखत्यारितील १६ शाळांच्या सुधारणेसाठी विद्यार्थीसंख्या, शाळांच्या इमारतींची सद्यस्थिती, झोपडपट्टी व वंचित वस्त्यांची ठिकाणे तसेच विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ यांचा अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपलब्ध संख्या लक्षात घेऊन शाळांची संख्या निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांच्या भौतिक सुविधांसोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. महानगरपालिका हद्दीत विकसित करण्यात येणारी ग्रंथालये पारंपरिक पद्धतीची न ठेवता आधुनिक स्वरूपात विकसित करावीत.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, संशोधक आणि नियमित वाचक यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र अभ्यासिका, मुक्त वाचन क्षेत्र, संगणक व लॅपटॉप सुविधा, दूरदर्शन संच, ऑनलाइन मार्गदर्शन आणि संशोधन विभाग उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मनपा शाळांचे दुरवस्था दूर करण्यासाठी मनपाने जोरकस पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

उद्यानांच्या कामांना गती

महापालिकेच्या माध्यमातून सुधारण्यात येणाऱ्या उद्यानांच्या प्रलंबित निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात. उद्यानांमध्ये वृक्षारोपण, धूळ व प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना तसेच नागरिकांसाठी आरोग्यदायी सुविधा निर्माण कराव्यात. सर्व प्रकल्पांचे डिझाईन, खर्च, निविदा प्रक्रिया आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक निश्चित करून कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT