मत्स्योदरी नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात file photo
जालना

Navratri Festival : मत्स्योदरी नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

नऊ दिवस घटी बसण्याची परंपरा; आकर्षक विद्युत रोषणाईचे काम पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

Preparations for the Matsyodari Navratri Festival are in the final stages

अंबड, पुढारी वृत्तसेवा : स्कंदपुराणातील उल्लेखानुसार सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या अंबड येथील आदिशक्ती श्री मत्स्योदरी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव दि. ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. देवी संस्थान व प्रशासनाच्या वतीने यात्रेची जोरदार तयारी सुरू असून, मंदिराची रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. मंडप, बॅरिकेडिंग, दुकानांची मांडणी, दर्शनरांगा तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.

मत्स्योदरी देवीचा डोंगर माशाच्या आकाराचा असून, मंदिराचा गाभारा माशाच्या पोटाच्या भागात असल्याप्रमाणे रचना असल्याने देवीला 'मत्स्योदरी' हे नाव पडल्याची आख्यायिका आहे. मंदिरात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या त्रिस्वरूपात देवीचे तीन तांदळे असून, त्यामुळे या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

शारदीय नवरात्रोत्सवात नऊ दिवस मंदिर परिसरात घटी बसून उपवास करण्याची परंपरा आहे. दरवर्षी सुमारे आठशे ते हजार भाविक नऊ दिवस येथे मुक्काम करतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी असते. संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सभागृह व भक्तनिवास परिसरात निवास, स्नान व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच लहान मुलांचे नवस कापडी झोळीतून उंचावरून टाकून फेडण्याची आगळीवेगळी परंपराही येथे आहे.

पूर्वी मंदिराच्या गच्चीवरून सुमारे वीस फूट उंचीवरून हा विधी केला जात असे; आता दोन-तीन फूट उंचीवरूनच नवस फेडला जातो. मंदिराकडे जाणाऱ्या सुमारे शंभर पायऱ्यांवर नारळ फोडण्याचीही परंपरा आहे. यावर्षी दोन्ही मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिराच्या शिखरापर्यंत आकर्षक भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. हे दृश्य पाहण्यासाठी आत्तापासूनच संध्याकाळी भाविकांची गर्दी होत आहे. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला सुरुवात होऊन २० ऑक्टोबर, विजयादशमीपर्यंत यात्रा सुरू राहणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी सातवी माळ असल्याने यात्रेचा मुख्य दिवस असणार असून, सायंकाळी आरतीनंतर परंपरेनुसार फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीची दर्शन यात्रा भरणार आहे.

संस्थान परिसरात चोख बंदोबस्त

यात्रेदरम्यान वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संस्थानच्या वतीने दर्शनरांगा, पायऱ्यांवरील मंडप, घटस्थापनेसाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था आणि अन्य आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहेत. यात्रेच्या तयारीवर तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष सोमेश मोहिते, सचिव तथा नायब तहसीलदार एकनाथ भोजने आणि व्यवस्थापक कैलास शिंदे लक्ष ठेवून आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ व पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने यात्रेसाठी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT