Power supply is being disrupted daily in Jalna city
आप्पासाहेब खर्डेकर
जालना : महावितरणच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ पहिल्याच पावसाने उघडे पडले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे जालना शहरासह ग्रामीण भागातील बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. जालना शहरात दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे.
सालाबादाप्रमाणे मोठा गाजावाजा करून महावितरण विभाग मान्सूनपूर्व कामावर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र त्याचा उपयोग हा होताना दिसत नाही. प्रत्यक्ष काम न करता कागदोपत्री काम पूर्ण दाखवून कोट्यावधीचा मलिदा कंत्राटदार व अधिकारी परस्पर लाटण्याचे काम करतात.
हा गोरख धंदा महावितरण विभागात परंपरेनुसार दरवर्षीचा आहे. मात्र याचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसताना दिसत आहे. पंधरा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. महिनाभरापूर्वी व गेल्या आठवड्यात झालेल्या वादळ वारा आणि पावसामुळे वीज गायब झाली होती. काही गावात तर दोन-तीन दिवस वीज चमकली नाही. वीज वाहिनीचा फॉल्ट काढण्यासाठी महावितरणचा सर्व कर्मचारी अनेक तास झटत होते.
वीज खंडित होण्याच्या जालना शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या तक्रारींमुळे शिवेसेनेचे (शिंदे) आ. अर्जुन खोतकर यांनी दहा दिवसांपूर्वी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात पदाधिकायांसह जाऊन जाब विचारला.
वारंवार वीज खंडित होत असल्याने सत्ताधारी व विरोधकांनी आवाज उठवला आहे. तरीही महावितरणचे अधिकारी घाबरत नाही. महावितरणच्या वतीने दरवर्षी लाखो रुपये खर्च करून मान्सूनपूर्व कामे करतात. कामे म्हणजे गुत्तेदाराचे खिसे भरण्याचे दिसून येत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने जालना महावितरण विभागाचा दुरुस्तीवरील खर्चाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.रमेश देहेडकर, सामाजिक कार्यकर्ते, जालना
वीजपुरवठा खंडित होत असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली 'महावितरण'च्या कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालण्यात आला.