

'CRA' technology useful for orchards
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: जर आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितले तर क्लायमेट रेसिलीयंट एग्रीकल्चर म्हणजे सीआरए हे तंत्रज्ञान फळबाग लागवडीसाठी खूप उपयुक्त आहे, असे प्रतिपादन सहायक कृषी अधिकारी एम. के. बिराजदार यांनी केले आहे.
तालुक्यातील राजेगाव येथे फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवनाथ उगले, संदीप उगले, भागवत उगले, नवनाथ सपाटे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना बिराजदार म्हणाले की, शेती क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे शेतकरी कमीत कमी पाण्यात व कमीत कमी क्षेत्रात देखील लाखोंचे उत्पादन मिळवू लागले आहेत. आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करतात व फळबाग तसेच भाजीपाला लागवडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान देखील वापरतात.
अशा तंत्रज्ञान वापरामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर सहाय्य केले जाते. एवढेच नाही तर या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड प्रात्यक्षिक देखील आयोजित करण्यात आलेले होते. हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून याचा वापर करून रोपांची लागवड केली तर दुष्काळी परिस्थिती देखील फळबाग जगवणे शक्य होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरानी मार्गदर्शन करून समस्याचे निरकरण केले. यावेळी शेतकरी यांची उपस्थिती होती.
या तंत्रज्ञानामध्ये फळबाग लागवड करण्याआधी शेतामध्ये तीन फूट लांब, तीन फूट रुंद तसेच तीन फूट खोल खड्डा केला जातो व या खड्ड्याच्या चार कोपऱ्यांवर चार इंच व्यासाचे तीन फूट लांब असलेले पाईप उभे केले जातात. नंतर मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून हा खड्डा शेणखत तसेच पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व मातीचे मिश्रण आणि दीड फूट पर्यंत भरला जातो. त्या ठिकाणी फळझाड लावून भरलेला खड्डा मातीने भरून घेतला जातो.