Poor condition of Panand Road in Tembhurni
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील शेतरस्त्यांचे काम झाले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. शेतरस्त्यांच्या पहिल्याच पावसात रस्ते चिखलमय झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने चिखल तुडवतच शेतकऱ्यांना शेतात जावे लागत असल्याचे चित्र टेंभुर्णी परिसरात दिसून येत आहे.
टेंभुर्णी येथील जुना डावरगाव रस्ता या पाणंद रस्त्यावर तर एका पावसातच चिखलाची रबडी जमा झाली आहे. वाहनावर जायचे तर सोडा मात्र सध्या या रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले आहे. शिवाय याच रस्त्याच्या पलीकडे येथील कावळे वस्ती म्हणून धनगर समाजाची तीस ते चाळीस घरे वास्तव्यास आहे. याशिवाय गावातील जवळपास २०० शेतकरी याच वाटेने आपल्या शेतीत जा ये करीत असतात. वस्तीवरील शाळकरी मुलेही याच वाटणे टेंभर्णी येथे शाळेत येतात.
आजारी रुग्णांना देखील याच रस्त्याने रुग्णालयात न्यावे लागते. अशावेळी शाळकरी मुलांसह रुग्ण, शेतकरी व सामान्य जनतेला पावसाळ्यात चिखल तुडवत हा रस्ता पार करावा लागतो. वेळोवेळी मागणी करूनही आतापर्यंत या पाणंद रस्त्याचे काम झाले नाही. यामुळे शेतकरी यांना शेतात बी बियाणे, खत घेऊन जाण्यास अडचणी निर्माण होतात.
शेतकरी यांना विविध समस्यांना सामोरे जात शेती फुलवावी लागत आहे. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतात खताचे पोते ने-आण करणे आदी कामाकरिता शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा शेतकरी सर्जेराव देशमुख, गबजी जाधव, दत्तात्रय जाधव, शंकर भागवत, दत्ता सुरडकर, विठ्ठल उखर्डे, गजानन उखर्डे, राजधर उखर्डे, प्रभ वाघमारे, सचिन सपकाळ,शंकर उखर्डे, सारंग उखर्डे, नजीरखा पठाण मख्खनखा पठाण, आनंद उखर्डे, शालिग्राम धनवई, भानदास धनवई, सचिन मकटराव, काशिनाथ सपकाळ. राजधर उखर्डे, निखिल यांच्यासह आदी केली आहे
चिखल तुडवत जावे लागते शेतात शेतरस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. पावसाळ्यात रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात कामासाठी जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.- विनायक ढवळे, शेतकरी
सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याने बैलजोडी, ट्रॅक्टर नेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतरस्त्याचे खडीकरण करावे.- बाळू माघाडे, शेतकरी
या रस्त्यांचीही दुरवस्था
टेंभुर्णी येथील जुना डावरगाव रस्ता या पाणंद रस्त्यासह शिंदेवस्ती ते जुना पापळ रस्ता, पोलिस कॉलनी ते जुना काचनेरा रस्ता, जुना गणेशपूर रस्ता, पुंजाराम बाबा वस्ती रस्ता, राजुरपाटी ते डव्हळे शेत रस्ता आदी अनेक रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात शाळकरी मुलांसह शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.