BJP MLA BABANRAO LONIKAR Pudhari
जालना

Babanrao Lonikar: 'तुझ्या अंगावरील कपडे, चप्पल-बूट सरकारमुळेच'; आधी बेताल विधान, नंतर सारवासारव

BJP Babanrao Lonikar: भाजप आ. बबनराव लोणीकर बरळले; राज्यभरातून टीका

पुढारी वृत्तसेवा

Political statement of BJP MLA Babanrao Lonikar

जालना : पुढारी वृत्तसेवा

कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करतात. जे ट्रोल करतात. त्यांच्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, अरे बाबा... तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बूट, चप्पलसुद्धा सरकारमुळेच आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री, आ. बबनराव लोणीकर यांनी केले. या वक्तव्यावर स्वपक्षाबरोबरच विरोधकांनी टीकेची झोड उठवताच लोणीकर यांनी आपल्या वक्तव्याबाबत सारवासारव केली.

नीतिमत्तेचा अभाव : हर्षवर्धन सपकाळ

मानसिक, वैचारिक दिवाळखोरी आणि नीतिमत्तेचा अभाव या साऱ्यांचे प्रतिबिंब लोणीकर यांच्या एकंदर वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. लोणीकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

- लोणीकर नागरिकांना लाचार समजतात : संजय राऊत

बबनराव लोणीकर यांच्यासारखे लोक भाजपमध्ये आहेत. हे महाराष्ट्राने समजून घ्यायला हवे. ते लोक महाराष्ट्रातील नागरिकांना लाचार समजतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. जनता स्वाभिमानी आहे, लाचार नाही, हे लोणीकरांना समजले नाही, असेदेखील राऊत म्हणाले.

त्यांना महाराष्ट्राने जागा दाखवावी : विजय वडेट्टीवार

भाजप आमदाराचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आहे. लोणीकर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांना महाराष्ट्राने जागा दाखवायलाच हवी. सरकारी योजना या भाजपने स्वतःच्या खिशातून पैसे काढून दिल्यागत सांगणे ही जनतेची थट्टा असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मतदारांनी लक्षात ठेवावे : अंबादास दानवे

उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील लोणीकर यांच्यावर टीका केली. तुमचे कपडे, बूट, विधानसभेतील स्थानही जनतेमुळे आहे. इतकेच नाही तर निवडणूक येत आहे. त्यामुळे यांचे हे बोल मतदारांनी लक्ष्यात ठेवावे, असे आवाहनही दानवे यांनी केले.

रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही : बबनराव लोणीकर

माझ्यात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरुद्ध बोलणार नाही. राजकीय लोकांना माझ्या वक्तव्याच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. मी शेतकऱ्यांच्या विरोधात गेल्या ४० वर्षात कधीही बोललो नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मी २५ वर्षे निवडून येत आहे. मी हजार वेळा शेतकऱ्यांची माफी मागेन. पण, मी बोललो नाही. मी गाव पातळीवरील कार्यकर्त्यांविषयी बोललो, असे स्पष्टीकरण बबनराव लोणीकर यांनी दिले.

आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत, आम्हाला मालक बनता येणार नाही: मुख्यमंत्री

बबनराव लोणीकरांच्या विधानासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बबनराव लोणीकरांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. काही लोकांना उद्देशून जरी त्यांनी असे विधान केले असेल तरी ते करण्याचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान म्हणतात, मी प्रधानसेवक आहे. आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत. आम्हाला मालक बनता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT