पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात सध्या पावसामुळे निसर्ग पूर्ण बहरला आहे. हिरवीगार शेती, घनदाट झाडी आणि प्रसन्न वातावरणामुळे हा परिसर निसर्गप्रेमींचे आकर्षण बनला आहे. याच परिसरात मोराने पिसारा फुलवून नृत्य केल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. थुईथुई नाचणार मोर या भागातील शेतकर्यांनी बघितला आहे.
मोराने हिरव्या पिकांमध्ये उभे राहून आपला सुंदर पिसारा फुलवला आहे. पावसाळ्यातील ढगाळ वातावरण आणि थंड हवेमुळे मोर नाचत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. हे दृष्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पिंपळगाव रेणुकाई आणि परिसरातील जंगल पट्ट्यात मोर, हरीण यासारखे वन्यजीव मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
चांगल्या पावसामुळे चारा आणि पाण्याची मुबलकता असल्याने वन्यजीवांचे वास्तव्य येथे वाढले आहे. निसर्ग आणि वन्यजीवांचे हे सुंदर दर्शन परिसराला एक वेगळीच ओळख देत आहे.