पिंपळगाव रेणुकाई : दसरा सणाच्या दिवशी पिंपळगाव रेणुकाई परिसरातील वॉशिंग सेंटरवर ग्राहकांची संख्या निम्म्याहून कमी झाल्याचे दिसून आले आहे. विजयादशमीच्या दिवशी या वाशिंग सेंटर गर्दी भरपूर असायची आहे. दुष्काळाचा फटका वाशिंग सेंटरचालकांना बसलेला दिसून आला.
दसऱ्यादिवशी वाशिंग सेंटरवर एखादीच दुचाकी धुण्यासाठी येत होती. व्यावसायिक कसेबसे व्यवसाय टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात शेतातील चिखलामुळे ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी वाहनं खराब होतात आणि धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात वॉशिंग सेंटरवर येतात. यंदा पाऊसच नसल्याने वाहनं घाण होत नाहीत, त्यामुळे धुलाईचे कामच नाही.
दसऱ्याला वाहनांची पूजा केली जाते, त्यामुळे लोक दसऱ्यापूर्वी वाहनं चकाचक धुवून घेतात. हा या व्यावसायिकांचा सर्वात मोठा हंगाम असतो. पण यंदा शेतकऱ्यांकडे पैसाच नसल्याने लोक वाहन धुलाईकडे दुर्लक्ष करत आहेत. पाणी टंचाईचे संकट पाऊस नसल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल आटले आहेत. वॉशिंगसाठी लागणारे पाणी टँकरने विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे, पण उत्पन्न घटले आहे.
स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले की, "दररोज १५ ते २० गाड्या धुवायचो, आता ३-४ गाड्याच येतात. २००० रुपयांचा व्यवसाय ५०० रुपयांवर आला आहे. पाणी आणि कामगाराचा पगार काढणंही अवघड झालंय." पिंपळगाव रेणुकाई परिसरात जवळपास ५ ते ६ वॉशिंग सेंटर आहेत. सर्वांची हीच परिस्थिती आहे. शासनाने अशा छोट्या व्यावसायिकांना मदत करावी.जीवन गाढे, वाॅशिंग सेंटर चालक