अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या जांभळांवर नागरिकांनी अक्षरशः झडप घातली Pudhari
जालना

Jalna Accident | पिकअप पलटी: रस्त्यावर पसरलेल्या 3 लाखांच्या जांभळांवर नागरिकांची झडप; वाहतूक विस्कळीत

वडिगोद्री–पाचोड महामार्गावरील मुरमा शिवारातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Wadigodri Pachod Road Pickup Overturns

वडिगोद्री : वडिगोद्री–पाचोड राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात जांभळांनी भरलेले पिकअप वाहन पलटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जांभळे विखुरली. अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या जांभळांवर नागरिकांनी अक्षरशः झडप घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही घटना मंगळवारी (दि. २३) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातून खान्देशातील जळगावकडे जांभळांची वाहतूक करणारे पिकअप वाहन (एमएच १६ सीडी २४६४) मुरमा शिवारातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन पलटी झाले. वाहनात सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीची जांभळे भरलेली होती.

अपघातानंतर मोठ्या प्रमाणात जांभळे रस्त्यावर विखुरली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच मोठी गर्दी जमली आणि अनेकांनी पिशव्या, पोती तसेच अन्य साधनांद्वारे रस्त्यावर पडलेली जांभळे गोळा करण्यास सुरुवात केली. परिणामी घटनास्थळी काही काळ अनोखे आणि गोंधळाचे चित्र निर्माण झाले.

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच महिला-पुरुष मोठ्या संख्येने जांभळे गोळा करताना दिसून आले. इतकेच नव्हे तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या काही वाहनधारकांनीही आपली वाहने थांबवून जांभळे घेण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.

या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र काही काळ नागरिकांची गर्दी कायम राहिल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

दरम्यान, भोकरवाडी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेले वाहन रस्त्याच्या कडेला हटविले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे नुकसान झाले असून जांभळांच्या मालाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची परिसरात दिवसभर चर्चा रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT