Petrol Shortage in Jalna City
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र गुरुवारी दिवसभर पहायला मिळाले. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत होती.
जालना जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी कालच दुचाकी वाहनांसाठी २०० रुपयांपर्यंत आणि चारचाकी वाहनांसाठी २००० रुपयांपर्यंत इंधन भरण्याची मर्यादा निश्चित केली होती. मात्र या निर्णयानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून आली नाही. अनेक वाहनचालक एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर दुसऱ्या पंपावर जाऊन पुन्हा इंधन भरताना दिसून आले. त्यामुळे टंचाई अधिकच तीव्र झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली होती. काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना वेळेवर पोहोचण्यात अडचणी आल्याचेही समोर आले.
पेट्रोल व डिझेलचा पुरवठा लवकर सुरळीत करण्यात यावा, तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रश्नचिन्ह
प्रशासनाकडून मात्र इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 'ऑल इज वेल' असे सांगत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात दिसणारी परिस्थिती वेगळीच असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.