परतूर ः शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला असून, व्यापारी प्रतिष्ठाने आता असुरक्षित बनली आहेत. या वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ आणि शहरात मूलभूत सुविधांच्या, विशेषतः स्वच्छतागृहांच्या अभावावरून परतूर व्यापारी महासंघाने पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे निर्वाणीचा इशारा दिला. श्री समर्थ ट्रेडर्समधील 10 लाख रुपयांच्या धाडसी चोरीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेकडो व्यापाऱ्यांनी एकत्र येत शहरात लाँग मार्च काढला आणि प्रशासकीय ढिम्मपणाचा पाढा वाचला.
व्यापारी महासंघाचे राजेश मस्के, दिनेश होलानी आणि गौतम कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली मोंढा भागात शेकडो व्यापारी बांधव एकवटले. तेथून हा मोर्चा थेट पोलीस ठाण्यावर धडकला. 1 फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षय जिनिंग जवळील समर्थ ट्रेडर्स या आडत दुकानाची खिडकी तोडून तब्बल 10 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात कमालीची भीती आणि संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असूनही अद्याप त्यांच्या मुसक्या आवळल्या नसल्याने पोलिसांनी तातडीने तपास चक्राला गती देऊन रोकड हस्तगत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनानंतर व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा नगरपालिकेकडे वळवला. स्वच्छ भारतच्या वल्गना केल्या जात असल्या तरी, प्रत्यक्ष परतूर शहरात नागरिकांसाठी साधे स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याबद्दल व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात कामासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील महिला, वृद्ध आणि व्यापाऱ्यांची लघुशंकेसाठी मोठी कुचंबणा होत आहे.
नाले सफाईचा अभाव आणि अस्वच्छतेमुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले असून, पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करावी, अशी रास्त मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.या आंदोलनात दिलीप नहार, जगदीश झंवर, राजेश मुंदडा, मुकेश केजडीवाल, राजेंद्र झंवर, सुरेश मंत्री, रवी मुंदडा, ओमप्रकाश मोर, दीपक कदम, सुनील कोंडावार व्यापारी सहभागी झाले होते.
पोलिस प्रशासनाला धरले धारेवर
व्यापारी परिसरात रात्रीची गस्त वाढवणे, मुख्य बाजारपेठेत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करणे आणि संवेदनशील भागात नवीन सीसीटीव्ही बसवणे या मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले.