परतूर ः परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचे धाबे आता दणाणले आहेत. या बंडखोरांविरुद्धचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. तालुकाध्यक्ष बालासाहेब आकात यांनी हा अहवाल दिल्याने आता पक्षश्रेष्ठी नेमकी काय कारवाई करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण ताकदीने उतरण्याचे नियोजन केले होते. मात्र, पक्षाच्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी ऐनवेळी विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा खळबळजनक दावा या अहवालात करण्यात आला आहे. काही नेत्यांनी विरोधकांकडून आर्थिक लाभ घेऊन पक्षाशी बेईमानी केली आणि अधिकृत उमेदवारांच्या पाडापाडीचे राजकारण केले, असे गंभीर आरोप तालुकाध्यक्षांनी अहवालाद्वारे केले आहेत.
यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेतही मोठा फेरफार झाल्याचे या अहवालात नमूद असून, वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, ठराविक गटाच्या सोयीचे राजकारण करण्यात आले. यामुळे पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाल्याची तक्रार प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
यापुढे पक्षात केवळ एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी आग्रही मागणी बालासाहेब आकात यांनी केली आहे. संघटना मजबूत करण्यासाठी जुन्या-जाणत्या पण स्वार्थी नेत्यांना बाजूला सारून सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची विनंती त्यांनी केली आहे. पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, निवडणुकीत कोणी काय भूमिका बजावली याचे सर्व पुरावे पक्षश्रेष्ठींकडे दिले असून आता कडक कारवाईची आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रियाही आकात यांनी यावेळी दिली.
गद्दारांना माफी नाही - परतूर नगरपालिकेत काँग्रेसचा विजय निश्चित असतानाही काही नेत्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आणि आर्थिक लाभापोटी विरोधकांशी संधान साधले. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा बेईमान नेत्यांचा संपूर्ण अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पुराव्यासह सादर केला आहे. आगामी काळात पक्षात केवळ प्रामाणिक कार्यकर्त्यांनाच स्थान मिळेल आणि गद्दारांवर कठोर कारवाई होईल.बालासाहेब आकात, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, परतूर