परतूर ः शहरातील इंदिरानगर आणि एकतानगर परिसरात महावितरणने वीज चोरांविरुद्ध कडक पाऊल उचलले असून, तब्बल 13 जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले असून महावितरणच्या पथकाने सुमारे 2 लाख 27 हजार 470 रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे.
महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती यांच्या आदेशाने सहाय्यक अभियंता राधेश्याम कुमावत यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कुमावत आणि त्यांच्या पथकाने 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान इंदिरानगर आणि एकतानगर भागात तपासणी मोहीम राबवली होती.
या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर काळ्या वायरने थेट आकडा टाकून आणि काही ठिकाणी मीटरमध्ये फेरफार करून अनधिकृतपणे वीज वापरली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
या कारवाईत 13 ग्राहकांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून एकूण 9,952 युनिट्सची वीज चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, ज्याचे मूल्य 1 लाख 75 हजार 470 रुपये इतके असून, त्यावर तडजोडीची 52 हजार रुपये रक्कम आकारण्यात आली आहे.
परतूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव मुंढे हे करीत आहेत. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे अधिकृत ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत असून, वीज चोरी करणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे, असा इशारा महावितरण दिला आला आहे.