Jalna News : बदनापुरात रस्त्याच्या कडेला 'नकोशी'ला टाकले  File Photo
जालना

Jalna News : बदनापुरात रस्त्याच्या कडेला 'नकोशी'ला टाकले

माता न् तू वैरिणी; पाच दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाचा पालकांकडून त्याग, गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Parents abandon five-day-old female infant, case registered

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला पाच दिवसांच्या स्त्री जातींच्या अर्भकाला फेकून दिल्याचा प्रकार शनिवार दि. १ रोजी उघडकीस आला. या प्रकारामुळे मुलींबद्दल अजूनही समाजाची मानसिकता बदललेली दिसून येत नाही. मुलगा-मुलगी समान असल्याच्या कितीही वल्गना केल्या तरी सर्रासपणे मुलांमुलीत भेदभाव होत असल्याचे या प्रकारातून दिसून येते.

दरम्यान, शनिवार दि. १ रोजी रात्री एका व्यक्तींनी ११२ क्रमांकावरून जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर, निरंकारी पेट्रोल पंपाजवळ स्त्री जातीच्या एका नवजात बाळाला रस्त्याच्या कडेला टाकून दिले असल्याची माहिती दिली. रात्री गस्तीवर असलेले पोलिस अंमलदार सहायक फौजदार डोभाल आणि पोना. वेलदोडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना स्त्री जातीचे एक नवजात बालक जिवंत अवस्थेत आढळून आले.

या कृत्यामुळे नवजात बालिकेच्या जीवास व आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी त्वरित सरकारी दवाखाना बदनापूर आणि नंतर जालना येथे उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उप विभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती कुरेवाड, सफौ. गोविंद डोभाल, पोना. राजेंद्र वेलदोडे, पोकॉ. भिसे आदी करीत आहेत.

फेकू नका आम्हाला द्या आपत्य नको असेल तर त्याला कायदेशीर पध्दतीने आमच्याकडे सुपूर्द करा. ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीय राहते. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मात्र उघड्यावर बालकाला फेकल्यास गुन्हा नोंद होऊन सात वर्षापर्यंतच्या करावासाची शिक्षा किवा दंड अथवा दोन्ही होऊ शकतात.
एकनाथ राऊत, अध्यक्ष बाल कल्याण समिती जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT