परतूर ः तालुक्यातील रोहिणा खुर्द येथील मांडवा देवी मंदीर संस्थानमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दानपेटी फोडून सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेला 20 दिवस उलटून देखील चोरट्यांना थांगपत्ता लागत नसल्याने भाविकांतून पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
दरम्यान, मंदिराच्या दानपेटीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या घटनेला वीस दिवसांचा कालावधी उलटला आहे, तरीही पोलिसांना या चोरट्यांचा किमान सुगावा देखील लागलेला नाही.
मांडावा देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुरेश शेषराव गवळी यांनी परतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार मंदिरातील मोठी दानपेटी फोडलेली तर लहान दानपेटी जमिनीवर पडलेली आढळली. दानपेटीतील देवीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यामधील चोरट्यांनी मोठ्या दानपेटीतून दोन लाख रुपये किमतीचा ऐवज पळवला. त्यात असलेला पन्नास हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकुट, पन्नास हजार रुपये किमतीचा सोन्याचे एक तोळ्याचे फुल जोड, एक्कावन हजाराची, एक तोळ्याची चांदीची नथ, चाळीस हजार रुपयाची आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, नऊ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण दोन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
या घटनेनंतर परतुर पोलीस ठाण्यात अध्यक्ष सुरेश गवळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दि 26 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, 20 दिवसांचा कालावधी उलटूनही चोरट्यांचा कसलाही मागमूस पोलिसांना लागलेला नाही. चोरांचा तपास थंड बस्त्यात पडला असल्याचे आरोप होत आहे.
आरोपी लवकरच हाती लागतील ः रावते
परतुर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, की आम्ही घटनेच्या दिवसापासून कसून तपास करीत आहोत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डवरील चोरट्यांची माहिती तपासली जात आहे. परतूर परिसरातील तालुक्याच्या ठिकाणी मंदिरातील झालेल्या चोऱ्याचा माहिती घेत आहोत. चोराचा तपास लवकर लागेल.