पारध : पद्मावती-वालसावंगी मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींना लाकडी कठड्याचा आधार दिला आहे. pudhari photo
जालना

Jalna News : रस्त्यालगतच्या विहिरीला लाकडी कठड्याचा आधार

क्रेटा दुर्घटनेनंतरही रस्त्यालगतच्या उघड्या विहिरी 'जैसे थे

पुढारी वृत्तसेवा

पारध : पारध-पद्मावती-वालसावंगी मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींना कायमस्वरूपी संरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रस्त्यालगतच्या विहिरींना लोखंडी जाळी अथवा मजबूत संरक्षक कठडे उभारण्याऐवजी केवळ थातूरमातूर लाकडी अडथळे उभे करून त्यावर स्टिकर लावण्यापुरतीच कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे 'आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?' असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी पारध पद्मावती मार्गावर दुचाकीस्वर ल धडक देऊन क्रेटा कार रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली होती. तब्बल १२ ते १३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. या भीषण दुर्घटनेत अक्त्तर बेगम अमन उल्ला खान यांचा गाडीतच मृत्यू झाला, तर उपचारासाठी बुलढाणा येथे नेत असताना सुलताना बी. बेगम यांचा रस्त्यात मृत्यू झाला.

या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांना मजबूत संरक्षक कठडे किंवा लोखंडी जाळ्या बसविल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती फारशी बदललेली दिसत नाही. अनेक ठिकाणी विहिरींच्या कडेला केवळ लाकडाच्या फळ्या अथवा बांबू उमे करून तात्पुरते अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर त्यावर सूचना देणारे स्टिकर लावून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली आहे, अशी नागरिकांची भावना आहे.

विहिरीभोवती मजबूत लोखंडी जाळी, संरक्षक कठडे, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक तसेच रात्री स्पष्ट दिसतील अशी प्रकाशव्यवस्था करणे गरजेचे आहे. विशेषतः मुख्य रस्त्यालगत असलेल्या विहिरींना प्राधान्याने कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक आहे.

कायमस्वरूपी सुरक्षा हवी

रस्त्यालगत असलेल्या विहिरी रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाहीत. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला चिखल, अंधार आणि घसरडा रस्ता यामुळे धोका आणखी वाढतो. अशा परिस्थितीत केवळ लाकडी अडथळे उभारणे हा सुरक्षिततेचा उपाय होऊ शकत नाही.

एक दुर्घटना पुरेशी नाही का ?

जिल्ह्यात रस्त्यालगतच्या उघड्या किंवा असुरक्षित विहिरींमुळे यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या आहेत. एखादी दुर्घटना घडल्यानंतर काही दिवस प्रशासनाची धावपळ सुरू होते; मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा त्याच समस्या कायम राहतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

'विहिरी बुजवा किंवा सुरक्षित करा'

रस्त्यालगतच्या सर्व विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून ज्या विहिरी धोकादायक आहेत, त्यांना मजबूत लोखंडी जाळी व संरक्षक कठडे बसवावेत. तसेच धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर व सूचना फलक लावावेत. केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्षात सुरक्षितता निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT