

जालना : ऑगस्ट महिना संपत आला तरी जालना जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी न लावल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. जालना पाटबंधारे विभाग आणि लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या एकूण ६७ मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये आजमितीस अवघा १४.६१ टक्के (३६.१० दशलक्ष घनमीटर) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील एकूण ६० लघुप्रकल्पांपैकी तब्बल ३६ प्रकल्पांनी तळ गाठला असून (जोत्याखाली), आगामी काळात मोठ्या पाणीटंचाईचे गडद सावट निर्माण झाले आहे.
पाठबंधारे विभागाकडून प्राप्त झालेल्या गुरुवार, दि. २७ रोजीच्या अधिकृत अहवालानुसार, जालना जिल्ह्यातील ७ मध्यम आणि ६० लघु अशा ६७ प्रकल्पांची एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठवण क्षमता २४७.१६ दलघमी आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्व धरणांमध्ये मिळून केवळ ३६.१० दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाचा काळ अजून बाकी असल्याने परतीच्या पावसावरच आता शेतकरी आणि नागरिकांची भिस्त अवलंबून आहे. पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील ६० लघु पाटबंधारे प्रकल्पांची साठवण क्षमता १८१.३७ दलघमी असून, त्यात सध्या केवळ २०.६९ दलघमी (११.४१ टक्के) पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील ६० पैकी ३६ लघु तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा संपला असून ते जोत्याच्या खाली (डेड स्टोरेज) गेले आहेत. १३ प्रकल्पांमध्ये ० ते २५ टक्के, ५ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के, ४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के, तर केवळ २ प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. एकही लघुप्रकल्प अद्याप पूर्ण भरलेला (ओव्हर फ्लो) नाही. यामुळे येत्या काळात पाणी टचांई गडद होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.