Pankaja Munde: No farmer should be deprived of government assistance.
जालना, पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे अथवा पुरांमुळे बाधित झालेला जिल्ह्यातील एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक अजयकुमार बसंल, जि.प. चे अति मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी श्रीमती मुंडे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे अथवा पुरांमुळे शेती पिकांचे नुकसानाचे सविस्तर पंचनामे सर्व्हे करुन, सादर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यासाठी मागणी करण्यात आलेले अनुदान ३ ते ४ दिवसात उपलब्ध होईल. तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधीची मागणी करण्यात यावी.
तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम प्राधान्य करण्यात येणार आहे. याबरोबरच पुरामुळे गावामधील अनेक जमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना रोजगार मिळण्यासाठी जमीन खोलीकरण व रुंदीकरणाची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याच्या सूचना केल्या.
पोलिस पाटलांच्या भरतीत पारदर्शकता
जिल्ह्यात नुकतीच पोलिस पाटील भरती प्रक्रिया पार पडली असून या भरती प्रक्रियेतून ५५४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने ही भरती प्रकिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडली याकरिता श्रीमती मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.