Jalna Drought News : दुष्काळात पंचायत समितीच्या पाणीटंचाई विभागाला कुलूप file photo
जालना

Jalna Drought News : दुष्काळात पंचायत समितीच्या पाणीटंचाई विभागाला कुलूप

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामीण नागरिकांची कुचंबणा, वरिष्ठांनी लक्ष द्या

पुढारी वृत्तसेवा

Panchayat Samiti's water scarcity department locked during drought

अंबड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना नागरिकांच्या पाणीविषयक समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या पंचायत समितीतील पाणीटंचाई विभागाचे कामकाज मात्र ठप्प असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीकडे कर्मचारी व अधिकारी पुरेशा संख्येने असतानाही कार्यालयीन वेळेत अनेक जण कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिक विविध शासकीय योजना, पाणीटंचाई, पाणीपुरवठा, गावातील विकासकामे तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी अंबड पंचायत समिती कार्यालयात येतात. संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी भेटतील आणि आपले काम मार्गी लागेल, या अपेक्षेने नागरिक दिवसभर कार्यालयात थांबतात. मात्र, पाणी टंचाई विमान अंबड : पाणीटंचाई विभाग बंद असल्याचे दिसून येत आहे.

अनेकदा संबंधित अधिकारी-कर्मचारी कार्यालयातच उपलब्ध नसल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागते. एखाद्या कामासाठी वारंवार पंचायत समितीचे हेलपाटे मारावे लागत असल्याने ग्रामीण नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कार्यालय हे नागरिकांच्या कामासाठी असताना अधिकारी कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसतील तर नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेषतः पाणीटंचाईच्या काळात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. गावागावांतून पाण्याच्या समस्या घेऊन नागरिक पंचायत समितीत येत असताना पाणीटंचाई विभागच बंद असल्याचे चित्र असेल, तर टंचाईग्रस्त गावांच्या समस्या सोडविणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. पंचायत समितीतील काही अधिकारी-कर्मचारी कार्यालयात नियमित उपलब्ध न राहता कार्यालयाबाहेरूनच आपल्या सोयीप्रमाणे कामकाज पाहत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. काही ठराविक व्यक्तींना कार्यालयाबाहेर भेटून त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जात असल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जात आहे.

तालुक्यात अनेक गावांना उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारी, टँकरची मागणी, विहिरींची स्थिती आणि गावातील पाणीप्रश्न यासाठी नागरिक पंचायत समितीशी संपर्क साधतात. मात्र, संबंधित विभागात अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना योग्य माहिती किंवा मार्गदर्शन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

ऐन टंचाईच्या काळात विभागाने अधिक सक्रिय राहणे अपेक्षित असताना कार्यालयीन कामकाजाबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक प्रमोद नारायण वाघ यांना कार्यालयातच मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेने पंचायत समितीतील वातावरण आणि कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतरही पंचायत समितीचा कारभार विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. आता अधिकारी-कर्मचारी कार्यालयात नियमित उपलब्ध राहत नसल्याचे दिसून येत आहे.

वरिष्ठांनी लक्ष घालावे

गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी या कार्यालयात क्वचितच उपलब्ध होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतील आणि वरिष्ठ अधिकारीही उपलब्ध होत नसतील, तर आपल्या समस्या व तक्रारी मांडायच्या तरी कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. वरिष्ठ प्रशासनाने पंचायत समितीतील प्रत्यक्ष उपस्थितीची पाहणी करून गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

यावर्षीचा दुष्काळ अत्यंत गंभीर असून शेतकरी अक्षरश भरडल्या जात आहे. येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनणार आहे. सगळीकडची परिस्थिती पाहता शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुष्काळा बाबत संवेदनशील राहावे, अशी अपेक्षा आहे.
-डॉ. राहुल डोंगरे, जिल्हा सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT