Strawberries : भीषण दुष्काळावर मात करीत माळरानावर फुलवली स्ट्रॉबेरी ! file photo
जालना

Strawberries : भीषण दुष्काळावर मात करीत माळरानावर फुलवली स्ट्रॉबेरी !

अंबड तालुक्यातील कौचलवाडीतील दोन भावांचा प्रयोग, १० टन उत्पादन अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

Overcoming a severe drought, strawberries were made to flourish on the barren uplands!

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर अंबड तालुक्यातील कौचलवाडी येथील गजानन टकले आणि लक्ष्मण टकले या दोन प्रयोगशील शेतकरी भावांनी पावसाचे अल्प प्रमाण, पाण्याची तीव्र टंचाई आणि उष्ण हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या माळरानावर लालचुटूक स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला आहे.

स्ट्रोबरी पिकांचे उत्पन्न १० टनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दुष्काळी भागातील शेतीला नगदी पिकांचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सुरुवातीच्या तोड्यात ३० ते ३५ किलो स्ट्रॉबेरी उत्पादन मिळाले. दर्जेदार आणि मोठ्या आकाराच्या फळांना प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपये, तर तुलनेने लहान आकाराच्या फळांना ३०० ते ३५० रुपये दर मिळत असल्याचे गजानन टकले आणि लक्ष्मण टकले यांनी सांगितले.

थंडीचा हंगाम टिकून असेपर्यंत स्ट्रॉबेरीला बाजारात चांगला भाव मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे. तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी विजय मुळक यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे त्यांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत योग्य दिशा मिळाली. छत्रपती संभाजीनगर येथील प्रोझोन मॉल, रिलायन्स मॉल तसेच शहरातील फळविक्रेत्यांपर्यंत माल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

शेततळ्यातील पाण्याचे काटेकोर नियोजन

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने परिसरात पाणीटंचाईचे संकट गंभीर आहे. अशा परिस्थितीत स्ट्रॉबेरीसारख्या संवेदनशील पिकाला पाणी उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान होते. मात्र, दोन्ही भावांनी शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करून लागवड यशस्वी केली. अवघ्या ५० ते ५५ दिवसांत उत्पादनाला सुरुवात झाली. सध्या दर दोन दिवसांनी स्ट्रॉबेरीचा तोडा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT