Only two days remain for filing nomination papers; prospective candidates are in a state of anxiety, and all parties face the challenge of preventing rebellion
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (माविआ) आणि महायुती या दोन्ही आघाड्यांतील जागा वाटपाचे गणित अद्याप सुटलेले नसल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू असली तरी अंतिम फॉर्म्युला ठरलेला नाही. तीच परिस्थिती महाविकास आघाडीतील घटक पक्षांची झाली आहे.
दरम्यान, महायुतीतील भाजप पक्ष ४० आणि शिवसेना देखील ४० जागांवर ठाम असल्याने यातून मार्ग काढताना पक्ष श्रेष्टींची अडचण होत आहे. तर महाविकास आघाडीतील निर्णय महायुती होणार की नाही, यावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. कोणत्या वॉर्डात कोणता चेहरा उतरणार, त्याला तोडीस तोड उमेदवार देत जागा वाटप जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून काँग्रेसला ३० जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. माविआ निश्चित असून जागा वाटपातील आकडे कमी-अधिक करून लवकरच घोषणा केली जाईल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी सांगितले.
शिवसेना (उबाठा) कडून काँग्रेसला २५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार अधिक प्रबळ आहे, याची चाचपणी करून त्या पक्षाला जागा देण्यात येणार असल्याचे उबाठाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी स्पष्ट केले. तर काँग्रेस नेते राजेंद्र राख यांनी सांगितले की, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उबाठा) यांचे प्रस्ताव आले असून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन त्यांनाही जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका बरिष्ठ नेत्यांच्या जालन्यात फेऱ्या वाढल्या आहेत. शनिवारी सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील आले होते, त्यापुर्वी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिक्षक राज्यमंत्री पंकज भोयर आदी बड्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले. या निवडणुकीसाठी जरी युती वा महाविकास आघाडी झाली नसली तरी इच्छुकांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
तिकीट मिळणारच हा विश्वास असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. तर युती वा आघाडी न झाल्यास बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही, भाजपकडून माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे महापालिका निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बैठका सुरू असल्या तरी महायुती आणि माविआतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचे दिसून येत आहे.
भाजपकडून महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे धुरा सोपवली आहे. बैठकांचे फड रंगत आहे. मात्र महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय होत नाही. भाजपा सर्वाधिक जागेवर ठाम आहे. तर शिंदेसेनेकडून अधिकच्या जागेवर दावा केल्या जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षांकडून ही जागा अधिक मिळाव्यात शिवाय, घटक पक्ष रिपाइंकडून ६ जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. तीच परिस्थितती महाविकास आघाडीतील घटक पक्षात पाहायला मिळत आहे. जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचे दिसून येत आहे.
इच्छुकांची घालमेल, बंडखोरीची शक्यता
आतापर्यंत सुमारे २ हजारांच्या पुढे अर्ज विक्री झाली आहे. तर सुमारे ४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती झाली नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी घालमेल सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याच मुलाखती महायुतीच्या घटक पक्षांची घेतल्या आहेत. जर युती वा आघाडी झाली तर बंडखोरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकिय वर्तुळात ऐकायवास मिळत आहे.
केवळ दोन दिवस शिल्लक
जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार व मंगळवार असे केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. युतीआघाडी होते की स्वबळावर लढावे लागते, यावरून शहरात चर्चेला उधाण आले आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या जालन्यात फेऱ्या
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री पंकज भोयर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जालन्यात भेट दिली. स्थानिक नेत्यांशी संवाद साधला. इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. मात्र, महायुतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात लोटून दिल्याने इच्छुक उमेदवारांना अजुन प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे