Online games increase mental stress; also increase the possibility of financial fraud!
आन्वा, पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीतील लॉकडाऊनच्या काळात विरंगुळा म्हणून ऑनलाइन गेम खेळण्याची क्रेझ झपाट्याने वाढली. ऑनलाइन गेम्स हे ग्राफिकल, आकर्षक आणि मनाला चटक लावणारे असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांकडून आता ऑनलाइन गेमच्या आड मुलांचा वापर करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न होत आहे.
परिणामी, अशा गेम्सपासून सावध राहण्याचे आवाहन भोकरदन सायबर पोलिसांनी केले आहे. अलीकडे सोशल माध्यमातील अनेक गेम्सचा स्तर उच्च दर्जाचा, आवड आणि आकर्षित करणारा असतो. एका ठराविक लेवलनंतर याचे व्यसन मुलांना जडते. मुलांना व्यसन जडताच पुढील लेवलसाठी पैसे भरण्याच्या सूचना दिल्या जातात. प्रारंभी नाममात्र शुल्क असते. जास्त लोकप्रिय असलेल्या गेम्सच्या सुरक्षेचे खंडन करून त्याच्यासारखे हुबेहूब पण, बनावट संकेतस्थळ तयार केले जातात.
तालुक्यात ऑनलाईन गेमिंगमुळे अनेकांनी आपले लाखो रुपये गमावले आहेत. त्यामुळे पालकांनी पाल्यांना मोबाईल न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, तरीही अनेक पालक पाल्यांना मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्यासाठी देतात. याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
सध्या ८ ते ९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींनाही पालकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक माहिती असतो. ते अनेकदा याचा वापरही करताना दिसतात. परंतु, हे धोक्याचे ठरू शकते. अशात गेम्सची पुढील लेवल खेळण्यासाठी ही मुले त्यात गेम खरेदीसाठी कार्डची गोपनीय माहिती शेअर करण्याची शक्यता असते. माहितीचा गैरवापर झाल्यास तुमच्या खिशाला फटका बसू शकतो. त्यामुळे अशा गेमिंगपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सतर्कता हीच सुरक्षितता
आपल्या पालकांच्या आणि मोबाईलच्या आधीच्या परवानगीशिवाय कोणताही गेम सुरू करू नका. आपण खेळत असलेला गेम सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करा. मुलांना खेळण्यासाठी वैयक्तिक मोबाइल, ऑफिस मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही डिव्हाइस देण्याचे टाळा. सतर्कता हीच सुरक्षितता आहे