One laborer killed, five injured after college slab collapses in Bhokardan
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आलापूर शिवारातील राजकुवर महिला महाविद्यालयाच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्याने एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहे.
शुक्रवारी महाविद्यालयाच्या गेट वर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान स्लॅब च्या खालच्या लाकडी बल्ल्या तुटल्या त्यामुळे पूर्ण स्लॅब खाली कोसळला, यावेळी स्लॅब भरणारे व खाली काम करणारे मजूर हे ढिगाऱ्याखाली दबल्या गेले त्यामध्ये मोतीलाल मिरगे (रा मुठाड) हे जागीच ठार झाले तर कृष्णा नामदेव हिरे, कृष्णा विठ्ठल शिंदे, फारुख खान शारूख खान, लक्ष्मण गणेश ठोंबरे, एकनाथ सोनुने हे जखमी झाले. त्यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात डॉ उमेश सहाणे यांनी प्राथमिक उपचार करण्यात केले. यापैकी दोघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल बांगर, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, प्रशांत उबाळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या इमारतीकडे धाव घेतली व मदत कार्य करून स्लॅब च्या मलब्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढले. जेसीबी चालक जमीर शेख, रुनिर शेख, कृष्णा दौड, विकास बरडे यांनी आपल्या दोन जेसीबी मशिनद्वारे दबलेल्या मजुरांना बाहेर काढले, त्यामुळे मजुरांचे प्राण वाचविण्यास मदत झाली आहे.