One arrested with village pistol and live cartridges
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १ गावठी पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी तीर्थपुरी येथील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकास मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित शंकर विक्रम ताटे (रा. तीर्थपुरी, ता. घनसावंगी) हा इसम अवैध शस्त्र बाळगत असल्याचे समजले होते.
पथकाने तीर्थपुरी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५० हजार ८०० रुपयांचे ०१ गावठी पिस्तूल व ०४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला शस्त्र पुरवठा करणाऱ्याचा शोध सुरू आहे. जालना शहरासह जिल्ह्यात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात अवैध गावठी पिस्तूल सापडले आहेत. अनेक खुनांच्या घटनांमधेही गावठी पिस्तूलचा वापर झाला असल्याने गावठी पिस्तूल कोठून येतात याचा शोध पोलिसांना घेणे गरजेचे आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने यशस्विरीत्या पार पाडली. अवैध गावठी पिस्तुलासह इतर शस्त्राबाबत पोलिस प्रशासनाने मोहीम उघडणे गरजेचे आहे. वाढत्या गुन्-हेगारीवर लगाम घालणे गरजेचे आहे.
ग्रामीणमध्ये पिस्तूल
जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खुनाचे प्रकार वाढले असून वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गावठी पिस्तुलचे लोण शहरापासून आता ग्रामीण भागापर्यंत पोहचल्याचे पहावयास मिळत आहे