Nutrition, education and health awareness campaign for sugarcane workers
जालना, पुढारी वृत्तसेवा : बाहेरगावी उसतोडीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबातील बालकांचे आरोग्य आणि पोषण सुध-ारण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून या मुलांसाठी परतूर तालुक्यातील १५ व घनसावंगी तालुक्यातील १५ अशा एकूण ३० गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत पोषणाचे महत्त्व, शरीरातील पोषकतत्वांची भूमिका, कुपोषणाची लक्षणे आणि प्रतिबंध, याबाबत बालक, गरोदर माता आणि स्तनदा मातांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आसनगाव, पाटोदा, पाडेपोखरी, पिपरखेडा बु., टेभी, अंतरवाली, आरगडे आणि गव्हाण येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उसतोड कामगारांच्या मुलांना स्थलांतरामुळे एकटेपणा जाणवू नये, शिक्षणात खंड पडू नये यासाठी संस्थेमार्फत भावनिक आणि शैक्षणिक मदत दिली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गाव पातळीवर परसबाग संकल्पना, ऑर्गनिक भाज्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शनासह मराठवाड्यातील पारंपरिक पदार्थांपासून पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज, फास्ट फूड आणि हेल्दी आहार यांची माहिती देण्यात आली.
मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या १२ अन्नघटकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून फळ वितरणही करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एकीलवाले, काळे, प्रशिक्षक तय्यब पठाण, जिल्हा समन्वयक एकनाथ राऊत, स्वयंसेवक महादेव खरात, दुर्गा नाडे, योगेश आढे, आकाश चैगुले, राजेश वाघमारे, सुरेखा वाघमारे तसेच आशाताईं, अंगणवाडी सेविका आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
उसतोड कामगारांच्या बालकांना चागल्या प्रकारे आहार पोषण बाबत महिती मिळावी. त्यांना त्याचे महत्व समजावे. यासाठी फुड फेअर कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्या निरोगी भाजीपाला मिळावा म्हणून संस्थेच्यावतीने परसबागसाठी किट वाटप करण्यात आले. त्यांना त्यातून भाजीपाला मिळत आहे. - आप्पासाहेब उगले, प्रकल्प संचालक