

Jalna News: New way to increase production through use of modern tools: Agriculture Officer Dr. Pawal
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : शेतीत वाढता मजुरी खर्च, वेळेची कमतरता आणि बदलते हवामान या संकटांमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना आधुनिक शेती अवजारे मात्र शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. त्यामध्ये पावर विडर हे अवजार विशेष उपयुक्त ठरत असून, कमी वेळेत, कमी खर्चात आणि अधिक प्रभावी मशागत शक्य होत असल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्याचे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पावर विडरसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना श्री ऍग्रो एजन्सी यांच्या मार्फत पावर विडरची डिलिव्हरी देण्यात आली. यावेळी डॉ. पवळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आत्माचे मुरलीधर गाढवे, श्री ऍग्रो एजन्सीचे संचालक गोविंद जिगे, अविनाश घोगरे तसेच मासेगाव येथील शेतकरी उपस्थित होते.
डॉ. पवळ पुढे म्हणाले की, तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी ऊस, कापूस, भाजीपाला आदी विविध पिकांमध्ये पावर विडरचा वापर सुरू केला असून, पिकांना हवा, पाणी व अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्याने उत्पादनात पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, असेही ते म्हणाले.
शेतातील तण नियंत्रण शक्य
पूर्वी तण नियंत्रणासाठी हाताने कोळपणी करावी लागत होती. यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागत असल्याने खर्चही वाढायचा. मात्र पावर विडरच्या साहाय्याने शेतातील तण नियंत्रण, आंतरमशागत आणि माती भुसभुशीत करणे ही कामे कमी वेळेत पूर्ण होत आहेत. याचा थेट सकारात्मक परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत आहे.