No rain in Wai area even after sowing twice
पांगरी, पुढारी वृत्तसेवा
मंठा तालुक्यातील वाई परिसरात १२ जुन रोजी मोठा पाऊस पडला होता. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. लहरी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नसल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी केल्यानंतरही मोठे पाऊस पडले नसल्याने शेतकऱ्यांच्या चितेत वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे.
वाई परिसरात पेरणी झाल्यानंतर एकही मोठा पाऊस पडला नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी व त्या अगोदर पडलेल्या हलक्या पावसाच्या आधाराने पिक कसेबसे तग धरून आहे. खरीप पिकात अंतर्गत मशागतीचे काम सध्या सुरू आहे. कपाशीला खत टाकणे, औषधी फवारणे, खुरपणी पिक तण रहीत करण्यात शेतकरी व्यस्त आहे.
शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला दिसत आहे. मोठा पाऊस झाला तरच विहिर, नदी व तलावातील पाण्याची पातळी वाढणार आहे. आगामी काही दिवसात मोठे पाऊस न पडल्यास खरीपाच्या पिकांवर गंभीर संकट ओढवणार आहे.