रवींद्र देशपांडे
भोकरदन तालुक्यातील गोषेगाव येथील निजामकालीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून डोक्यावर सुरक्षित छत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा शाळेच्या आवारात झाडाखाली भरते.
निजामकालीन मोडकळीस आलेल्या शाळेच्या खोल्या पडण्याच्या स्थितीत असूनही अजूनही त्या पाडण्यात आलेल्या नाहीत. याचबरोबर नवीन वर्गखोल्यांची मान्यता आणि निधी मिळालेला नाही. शाळेच्या सर्व खोल्या मोडकळीस आल्यामुळे पावसाळ्यात छतांमधून पाणी गळते, भिंती तुटल्या आहेत.
मुलांना बसायला टेबल-खुर्चा तर दूरच, चटईसुद्धा उपलब्ध नाही. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिक्षणाधिकारी भागवत यांनी दोन महिन्यांपूर्वी भेट दिली होती. पुढे काहीच झाले नाही.
यापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व शालेय समितीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पार पडले होते. नारळ फोडून कामाच्च्या शुभारंभाची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरूच झालेले नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः रस्त्यावर आले आहे.ज्ञानेश्वर मोहिते, सामाजिक कार्यकर्ते गोषेगाव
शाळेला नवीन वर्ग खोल्या मिळाव्यात म्हणून मी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. यापूर्वी निजाम कालीन शाळा खोल्या दुरुस्ती व नूतनीकरण या योजनेमध्ये या ठिकाणी शाळा खोल्यांना प्राथमिक मंजुरी मिळाली होती. निधीची तरतूद न झाल्याने या ठिकाणी नवीन शाळा खोल्याचे बांधकाम झाले नाही.गणेश बापू फुके, माजी जि. परिषद सदस्य