Next step for 'e-governance', 208 Zilla Parishad employees gave the test
जालना, पुढारी वृत्तसेवा: नव्याने १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती आराखडा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्याची पूर्वतयारी आणि कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी संगणकावर टंकलेखन चाचणीचे आदेश दिले होते.
त्या आदेशानुसार शुक्रवारी (दि.१३) सकाळी १०:३० ते दुपारी ४:३० यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेतील सुमारे २०८ कर्मचाऱ्यांनी संगणकावर टायपिंगची चाचणी दिली. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील लिपिकांवर या कामकाजाची मोठी जबाबदारी असते. परंतु, अनेकांना टंकलेखनाची अडचण येत असल्याने ऑनलाइनच्या कामातही अडथळे येतात.
जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यरत असलेल्या लिपिकांची कार्यक्षमता वाढावी यासाठी ही चाचणी घेण्यात आली. शासनाने गुरुवारी काढलेल्या परिपत्रकानुसार यापूर्वीच राज्यात १०० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. तडूंतर आता नव्याने १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती आराखडा राबवायचा असल्यामुळे तथा ई-गव्हर्नन्स कृती आराखड्याच्या अनुषंगाने स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
त्याची ही पूर्वतयारी असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, वित्त विभाग, कृषी व महिला बालविकास विभाग, बांधकाम, सिंचन व पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग प्राथमिक, पाणीपुरवठा विभागातील जवळपास २०८ लिपिक या परीक्षेत सहभागी झाले.
दरम्यान, विभाग प्रमुखांनी लिपिकांना चाचणीत सहभागी होण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश सीईओ बनसोडे यांनी दिले होते. या टायपिंग चाचणीत कोणी अनुपस्थित राहिले तर संबंधित लिपिकाची टायपींग चाचणी ही १६ जून रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत होईल.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, सहाय्यक प्रशासन अधिकारी रविंद्र व्यास, कनिष्ट प्रशासन अधिकारी नितीन श्रीमंगले, आकाश बरे आदींनी सनियत्रण केले.
ई - प्रशासन मूल्यांकनाचे टप्पे अंतरीम अहवाल : दि. १ ऑगस्ट अंतिम अहवाल : दि. २ ऑक्टोबर स्पर्धेचा निकाल : दि. २५ ऑक्टोबर सध्या जिल्हा परिषदेतील विविध विभागांचा कारभार ऑनलाईन झालेला आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी या हेतूने ही चाचणी घेण्यात आली, नव्याने सुरू झालेल्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यात ई- गव्हर्नन्सचा भर पडला आहे. याचीही तयारी या माध्यमातून होत आहे.-शिरीष बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना.