NCMC card makes ST travel easier
पारध, पुढारी वृत्तसेवा : एसटी प्रवासातील सुट्ट्या पैशांची कटकट आता कमी होणार आहे. एनसीएमसी कार्डमुळे प्रवाशांना कार्डमध्ये बॅलन्स ठेवून तिकीट काढता येत असल्याने रोख व्यवहाराला डिजिटल पर्याय मिळाला आहे. विशेषतः महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के प्रवास सवलत मिळत असल्याने ग्रामीण भागातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, बाजारपेठ तसेच उपचारांसाठी नियमित प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरत आहे.
१ ऑक्टोबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्डचा वापर महत्त्वाचा करण्यात आला आहे. कार्डची नोंदणी करून प्रत्यक्ष कार्ड मिळेपर्यंत पात्र प्रवाशांना क्यूआर कोड असलेल्या नोंदणी पावतीद्वारेही सवलतीचा लाभ घेता येतो. "पूर्वी गाडीत गर्दी असताना सुट्टया पैशांवरून किंवा पैशांच्या देवाणघेवाणीवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात कधी-कधी वाद होत असे. त्यात वेळ जात असल्याने बसला अनावश्यक विलंब होत असे आणि काही वेळा ठिकठिकाणी गाडी थांबवावी लागत होती. मात्र, एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे हा वेळ मोठ्या प्रमाणात वाचत आहे. तिकीट व्यवहार जलद होत असल्याने बसचा प्रवास सुरळीत सुरू राहतो आणि गाडी वेळेत पोहोचण्यासही मदत होते.
एनसीएमसी कार्डमुळे तिकीट व्यवहार अधिक सोपा झाला असून सुट्ट्या पैशांची अडचण कमी होते. महिलांना मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीचा लाभघेण्यासाठीही कार्ड उपयुक्त आहे. प्रवाशांनी कार्डमध्ये आवश्यक बॅलन्स ठेवून त्याचा वापर करावा."गणेश दांडगे, वाहक
आज पारध ते छत्रपती 6. संभाजीनगर प्रवास करताना एनसीएमसी कार्डद्वारे मला ५० टक्के प्रवास सवलत मिळाली. खर्च कमी झाला आणि तिकीट व्यवहारही सोपा झाला. महिलांसाठी ही सुविधा निश्चितच दिलासादायक आहे."- योगिता पिंपळे, महिला प्रवासी