Murder of a twenty-five-year-old youth in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरातील नूतन वसाहत भागात आठ ते दहा जणाच्या टोळक्यांनी विकास लोंढे विकास लोंढे (२५) या युवकाचा लाठ्या, काठ्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली.
नूतन वसाहत भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोंढे यांचा मुलगा विकास लोंढे हा एका नातेवाईकाच्या लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना घरापासून काही अंतरावर त्याला काही टवाळखोर तरुणांनी अडवले. यावेळी मागील भांडणाच्या कारणासह तू सोशल मीडियावर महापुरुषांचे व्हिडिओ का व्हायरल करतो या बाबतच विचारणा करीत टवाळखोर गुंडांनी विकासला अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी आरडाओरडा ऐकून त्याचे आई वडील व परिसरातील नागरिक भांडण सोडायला आले. मात्र तत्पूर्वीच विकासच्या डोक्याला व पायाला या टवाळखोर गुंडांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. नागरिकांना पाहून टवाळ खोर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. विकासला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारादरम्यानच विकास लोंढे याचा मृत्यू झाला. जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध विभागांत गुंड सक्रिय झाले आहेत. किरकोळ वादातून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली जात आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शहरातील स्टील उद्योजकाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता युवकाचा खून झाल्याची घटना घडल्याने जालनेकरांमध्ये दहशत आहे.
एक संशयित ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली होती. संबंधित टाळाखोर गुंड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करत त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी मयत विकास लोंढे यांचे वडील प्रकाश लोंढे यांनी केली आहे. या प्रकरणी एका आरोपीस नाशिक येथून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.