Jalna News : जलतारा भूजल पातळी वाढवण्यासाठी महापालिकेचा पुढाकार  file photo
जालना

Jalna News : जलतारा भूजल पातळी वाढवण्यासाठी महापालिकेचा पुढाकार

शोषखड्ड्यांच्या माध्यमातून भूगर्भात सोडले जाणार पाणी; १०० 'जलतारा'चे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation's initiative to raise groundwater levels through 'Jaltara'

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून जालना शहर महानगरपालिका व कुंडलिका-सीना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जून रोजी दुपारी १२:०० वाजता भोकरदन नाका येथे "पर्जन्य संचयन चला पाऊस साठवू" या महत्त्वाकांक्षी अभियानाचा अधिकृत शुभारंभकरण्यात आला.

महाराष्ट्र शासनामार्फत ग्रामीण भागांत राबविण्यात आलेल्या 'जलतारा' प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भूगर्भातील जलपातळीत मोठी वाढ झाली आहे. याच धर्तीवर, जालना नागरी क्षेत्रातही भूजल पुनर्भरण करण्यासाठी महानगरपालिकेने भोकरदन नाका येथील स्वमालकीच्या जागेवर पहिल्या जलतारा प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे.

या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या खुल्या जागांमध्ये पावसाचे वाहून जाणारे पाणी शोषखड्ड्यांच्या माध्यमातून भूगर्भात सोडले जाईल. जालना महानगरपालिका प्रशासनाने आगामी मार्च २०२७ पर्यंत शहरातील प्रत्येक प्रभागात किमान २ याप्रमाणे आणि शासकीय जागेवर संपूर्ण शहरभरात १०० जलतारा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सद्यस्थितीत भोकरदन नाका येथील प्रकल्प कुंडलिका सीना नदी रिझर्वेशन फाउंडेशनच्या माध्यमातून साकारण्यात आला असून, भविष्यातील उर्वरित प्रकल्प कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी सीएसआर निधी आणि महानगरपालिकेच्या स्वतःच्या निधीतून उभारण्यात येणार आहेत. या अभियानाचा प्रारंभ मनापा आयुक्त अंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी कुंडलिका सीना फाउंडेशनच्या अध्यक्षा नूतन देसाई, रोटरी क्लबचे डॉ. राजू जेथलिया, इनरव्हील क्लबच्या डॉ. सोनाली जेथलिया यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी आणि महानगरपालिकेचे संबंधित तांत्रिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील वाढती पाण्याची गरज आणि उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेता, मनपाचा हा जलपुनर्भरणाचा उपक्रम जालन्याला पाणीदार बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT