Motor vehicle inspector caught in ACB's trap
जालना, पुढारी वृत्तसेवा : ट्रक चालकाकडून अडीच हजारांची लाच घेताना सोलापूर जिल्ह्यातील नांदणी येथे गुरुवारी (दि.२५) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोटार वाहन निरीक्षकाला ताब्यात घेतले. वाहन पास करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ याने पंचासमक्ष अडीच हजारांची लाच स्वीकारली.
दरम्यान, तक्रारदार ट्रकचालक असून गुजरात चेन्नईदरम्यान मालवाहतूक करतात. नांदणी येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आरटीओचे चेकपोस्ट आहे. तेथील मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ याने तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेतली. शिवाय परत येताना वाहन पास करण्यासाठी पुन्हा तीन हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी २४ डिसेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सापळा लावण्यात आला. या सापळ्यत गुरुवारी (दि. २५) तानाजी धुमाळ यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती अमोल अण्णासाहेब पाटील (वय ५०, रा. अवंतीनगर, शिवाजीनगर सोलापूर) याला नांदणी येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पंचासमक्ष वाहन पास करण्यासाठी अडीच हजारांची लाच स्वीकारताना पकडले. त्याच्याजवळील रोख ११ हजार ८१० रुपये, मोबाईल, दोन अंगठ्या, चेन असा मुद्देमाल जप्त केला. तानाजी धुमाळ यालाही ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर, अंमलदार गजानन घायवट, भालचंद्र विनोरकर, गणेश चेके, संदीप लहाने, मनोहर भुतेकर, गजानन कांबळे, शिबलिग खुळे, अमोल चेके यांनी केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.