MLA Rohit Pawar's allegations against Bawankule are false: Lonikar
जालना, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर-शेगाव
पालखी मार्गाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरस लि. हैदराबाद या कंपनीवर अवैध मुरूम, वाळू आणि दगड उत्खननासाठी ९४ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. हा दंड तहसीलदार परतूर आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आकारण्यात आला आहे.
सदर दंड माफ झाला नसून स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आ. रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ९४ कोटींचा दंड माफ केल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा आ. बबनराव लोणीकर यांनी केला आहे.
आ. बबनराव लोणीकर यांनी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार यांनी बावनकुळे यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले.
यावेळी लोणीकर म्हणाले की, स्थगिती म्हणजे माफी नाही. येत्या दोन दिवसांत सदरील कंपनीकडून दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी हवेत गोळीबार करू नये असेही लोणीकर म्हणाले.
पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की, ६०० कोटी रुपयांच्या या रस्त्याचे काम गौण खनिजाच्या (मुरूम, वाळू) अभावी थांबले होते. कंपनीने हे गौण खनिज बेकायदेशीररीत्या उपसा केले आणि त्याचे पैसे भरलेले नाहीत.
हे प्रकरण मागच्या सरकारमधील आहे आणि बावनकुळे यांनी कोणताही दंड माफ केलेला नाही. त्यांनी रोहित पवारांनी केलेले आरोप धांदात खोटे असून, या निराधार आरोपांमुळे त्यांना आता राजकारणातून संन्यास घ्यायला हवा, असा सल्ला लोणीकर यांनी दिला.
अवैध उत्खनन
मेघा इंजिनिअरिंग कंपनीने गौण खनिजाचे अवैध उत्खनन केले असून, जालना येथील अप्पर जिल्हाधिकारी यांनी रु३८ कोटी ७० लाख आणि परतुर तहसीलदारांनी ५५ कोटी ९८ लाखांचा दंड आकारला आहे. काही प्रकरणांत अपिलामुळे दंडाच्या १% (१७.२८ लाख रुपये) रक्कम भरण्यास मंजी देण्यात आली होती. याचाच अर्थ, दंडाची रक्कम माफ झाली नसून केवळ काही प्रकरणांमध्ये अपिल दाखल केल्यामुळे तात्पुरती कार्यवाही थांबली.