MLA Arjunrao Khotkar in action mode regarding the electricity issue
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज तसेच महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक, व्यापारी, शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी वीज प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
२६ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजता भाग्यनगर येथील दर्शना बंगला येथे ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जालना शहर व ग्रामीण भागातील वारंवार होणारी वीज खंडितता, तांत्रिक बिघाड, अपुरी देखभाल, वाढत्या वीज मागणीच्या तुलनेत उपलब्ध यंत्रणा, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणी तसेच नागरिकांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.
यासोबतच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना, आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची उपलब्धता याबाबतही चर्चा होणार आहे. बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता (शहर), शहर अभियंता, उपअभियंता (ग्रामीण) तसेच सर्व शाखा अभियंते उपस्थित राहणार आहेत.