Minor Irrigation Department officers, employees are not present in time
जालना, पुढारी वृत्तसेवा : शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्याची वेळ शासनाने निश्चित करून दिलेली असतानाही सोमवार (दि. २१) रोजी लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लेटलतीफपणा उघड झाला आहे. साडेअकरा वाजेपर्यंत या कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. अधिकाऱ्यांनी वेळा न पाळल्यामुळे नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शासनाने गेल्या काही वर्षांपूर्वी पाच दिवसांचा आठवडा केलेला आहे. शनिवार आणि रविवारी सलग दोन दिवसांची सुट्टी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली होती. दरम्यान, पाच दिवसांचा आठवडा करण्यात आल्यामुळे कार्यालयीन वेळेतील बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी ९:४५ वाजता अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. सायंकाळी ६:१५ वाजेनंतर कार्यालय सोडवे असे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे प्रत्येक कार्यालयात या वेळेनुसार अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र, जालना जिल्ह्यात या कार्यालयीन वेळांना बहुतांश कार्यालयात केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून येत आहे. सोमवार, (दि. २०) रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत मोतीबाग परिसरातील लघु पाटबंधारे विभागाची दै. पुढारीच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता या कार्यालयात सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त एक शिपाई हजर होता. ११ वाजेनंतर तीन चार कर्मचारी कार्यालयात दाखल झाले. कार्यकारी अभियंता रोहित देशमुख हे देखील कार्यालयात हजर नव्हते.
त्यामुळे त्यांच्या अधिनस्त उप कार्यकारी अभियंता व अन्य अधिकारी कर्मचारी देखील हजर नसल्याचे दिसून आले. दुपारी १२ वाजेनंतरच बहुतांश कर्मचारी कार्यालयात हजेरी लावत असल्याचे दिसून आले. अधिकारी, कर्मचाऱ्यांची मनमानी बहुतांश कार्यालयात दिसून येत असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. कार्यालयीन कामकाजावर देखील यामुळे विपरित परिणाम होत आहे.
जालना लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी आपत्कालीन कामानिमित्त मंठा येथे आलेलो आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची आढावा घेऊन कारवाई करतो, असे सांगून वेळ मारुन नेल्याचे दिसून आले.