Medical officer, employee Allergy living headquarters News published by Daily Pudhari
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची अॅलर्जी या मथळ्याखाली ४ जुलै रोजी दै. पुढारीने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारी यांनी आन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या संबंधित चोवीस तास सेवा देणे, गावखेड्यात रात्री-अपरात्री आजारी पडलेल्या रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार असतो. परंतु, भोकरदन तालुक्यातील आन्वा आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला जात आहे.
याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास बंधनकारक करावे, अशी मागणी रुग्णांसह नागरिकांमधून होत आहेत. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहणे कायद्याने बंधनकारक आहे.
असे असतानादेखील तालुक्यातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. बहुतेक सर्वजण बाहेर गावाहून ये-जा करत असल्याने रात्री-अपरात्री रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य आजार डोके वर काढत असतात, शिवाय शेतात सर्प दंशाचे प्रकार घडतात. खेड्यात दळणवळणाची तोकडी सुविधा पाहता रात्री-अपरात्री गरोदर महिलांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारती निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. अशा आशयाचे वृत्त दै. पुढारीमध्ये ४ जुलै रोजी प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी भुसारी यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.