Ganeshotsav 2026 : विसर्जन कुंडाची महापौर-उपमहापौरांकडून पाहणी file photo
जालना

Ganeshotsav 2026 : विसर्जन कुंडाची महापौर-उपमहापौरांकडून पाहणी

गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज; स्वच्छता, सुरक्षा व सुविधांना प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

Mayor and Deputy Mayor inspect immersion tank

जालना, पुढारी वृत्तसेवा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावी, यासाठी जालना महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोती तलाव येथील गणेश विसर्जन कुंडाची महापौर श्रीमती वंदना अरुण मगरे आणि उपमहापौर राजेशजी राऊत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

विसर्जन कुंड परिसरातील स्वच्छता, पाणीपातळी, विद्युत व प्रकाश व्यवस्था, निर्माल्य संकलन तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. विसर्जनाच्या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापौर व उपमहापौरांनी दिल्या.

पाहणीनंतर महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि आयुक्त अंजली शर्मा यांच्या उपस्थितीत महापालिका कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. विसर्जन कुंड परिसरात हायमास्ट लाईटसह आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त प्रकाश व्यवस्था करण्याचे निर्देश विद्युत विभागाला देण्यात आले.

तसेच अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले. विसर्जन कुंड परिसरात चोख स्वच्छता राखण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व प्रभावी व्यवस्था करण्याचे निर्देश स्वच्छता विभागाला देण्यात आले. परिसरात कचरा साचणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले. यावेळी नगरसचिव केशव कानपुडे, स्वच्छता व अतिक्रमण सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर, नगर अभियंता सय्यद सऊद, विद्युत अभियंता कोमल गावंडे, अग्निशमन अधिकारी पानपट्टे, मालमत्ता अधीक्षक राजेश चंदनशिवे, शहर स्वच्छता प्रमुख सुधीर डहाळे, वाहन शाखा प्रमुख अशोक कटारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अग्निशमन दल सज्ज ठेवणार : विसर्जन कुंडातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात ठेवण्याबरोबरच गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. विसर्जनाच्या वेळी गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला. गणेश विसर्जनाच्या कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी अग्निशमन दल सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्रीसह यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT